नांदुरा (ता. नांदुरा) :
दिनांक 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता पोलीस स्टेशन नांदुराच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मलकापूरकडून नांदुराकडे येणाऱ्या आयशर वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू वाहून नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
मोठी हनुमान मूर्तीसमोर उभारलेल्या नाकाबंदीत पोलिसांनी लालसर रंगाचे आयशर वाहन (क्रमांक GJ-01 KT-8440) अडविले. वाहन चालक कमलोद्दिन शेख कमरुद्दिन शेख (रा. अहमदाबाद, गुजरात) याची चौकशी केली असता संशय आल्याने वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनातून मोठ्या प्रमाणात ईगल हुक्का-शीशा तंबाखूचे पाऊच आढळून आले.
अन्न व सुरक्षा प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी केली असता, एकूण 18 लाख 70 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 1,672 सुगंधित तंबाखू पाऊच (किंमत 10.70 लाख रुपये) व वाहतुकीसाठी वापरलेले आयशर वाहन (किंमत 8 लाख रुपये) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी आरोपी कमलोद्दिन शेख यांच्या विरोधात गुन्हा क्र. 436/2025 नोंदविण्यात आला असून, विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव धंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक विनीत घाटोळ, कैलास सुरडकर, रवी सावळे, संदीप डाबेराव, राहुल ससाने व विनायक मानकर यांनी केली.
0 Comments