मोताळा तालुका | २७ ऑगस्ट – बुलढाणा ते मलकापूर राज्य मार्गावरील खडकी फाटा, मोताळा नजीक येथे बुधवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात १० मेंढ्यांचा करुण अंत झाला.
माहितीनुसार, मेंढ्यांचा कळप रस्त्यावरून जात असताना मलकापूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव राज्य परिवहन महामंडळाची बस आली आणि अचानकपणे त्या मेंढ्यांवर धडकली. बसखाली चिरडल्याने जागीच १० मेंढ्या ठार झाल्या.या घटनेमुळे रस्त्यावर रक्त आणि मांसाचा सडा पडल्याने परिसरात भीषण व वेदनादायी दृश्य दिसून आले. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली आणि काही काळ राज्य महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
घटनास्थळी खडकी व आसपासच्या गावातील मेंढपाळ व नागरिकांनी धाव घेतली. या अपघातामुळे संबंधित मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आहे.
या दुर्घटनेची माहिती नागरिकांनी तत्काळ बोराखेडी पोलीस ठाण्यास दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
या प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.
0 Comments