चिखली तालुक्यातील मलगी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट; आई-मुलगा गंभीर जखमी


चिखली तालुक्यातील मलगी येथील एका घरात घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन आई व मुलगा गंभीररित्या जखमी झाले. या घटनेत जखमी झालेल्या शोभा रमेश परिहार व त्यांचा मुलगा राजेश रमेश परिहार (वय २४) यांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी शोभा परिहार या अंगणवाडी मदतनीस असून त्यांच्या पतीचे निधन सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी झाले होते. त्यामुळे त्या आपल्या मुलासोबत एकट्याच घरी राहतात.

घटना मंगळवारी (२६ ऑगस्ट) रात्री ९ वाजता घडली. स्वयंपाक करत असताना अचानक तांत्रिक बिघाडामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा जोरदार आवाज ऐकून गावकरी तात्काळ घटनास्थळी धावले. या दुर्घटनेत शोभाबाईंच्या अंगावरील साडी व केस जळाले असून हातालाही गंभीर भाजल्या आहेत. तर मुलगा राजेशच्या पायाला भाजल्याची माहिती आहे.

घटनेनंतर चिखली नगरपरिषद अग्निशमन दलाचे वाहन, चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांत राऊत, सरपंच विनायक साप्ते व दिलीप शितोळे यांनी मदत व सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments